कुणाल खेमूला मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन ई-चलान पाठवलं!
एबीपी माझा वेब टीम | 21 Mar 2018 01:27 PM (IST)
कुणाल खेमू हेल्मेटशिवाय बाईक चालवत असल्याचा फोटो एका ट्विपले पोस्ट केला होता. या ट्वीटमध्ये त्याने मुंबई पोलिसांनाही मेन्शन केलं. कुणालला ई-चलान मिळायलाच हवं, असं त्याने ट्वीटमध्ये लिहिलं होतं.
मुंबई : आपल्या अनोख्या पण दमदार ट्वीट्समुळे मुंबई पोलिसांचं ट्विटर अकाऊंट कायम चर्चेत असतं. आता मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूला ट्विटरवरुनच ई-चलान पाठवलं आहे. हेल्मेटशिवाय बाईक चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याला ई-चलान पाठवलं आहे. कुणाल खेमू हेल्मेटशिवाय बाईक चालवत असल्याचा फोटो एका ट्विपले पोस्ट केला होता. या ट्वीटमध्ये त्याने मुंबई पोलिसांनाही मेन्शन केलं. कुणालला ई-चलान मिळायलाच हवं, असं त्याने ट्वीटमध्ये लिहिलं होतं. मुंबई पोलिसांनी याची दखल घेत, कुणाल खेमूला ई-चलान पाठवलं. शिवाय चलानचा फोटोही ट्विटरवर शेअर केला. तुमच्या ट्वीटने आमच्या लक्षात आणून दिलं. ई-चलान नंबर MTPCHC1800225825 संबंधिताला पाठवलं आहे, असं पोलिसांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. "मी हे फोटो पाहिले, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते फारच लाजिरवाणे आहेत. मला बाईक्स आवडतात आणि दररोज चालवतो, हेल्मेट घालून. नेहमीच हेल्मेट घालावं, मग तो जवळचा प्रवास असो वा लांबचा प्रवास. मी माफी मागतो. मला चुकीचं उदाहरण बनायचं नाही," असं ट्वीट कुणालने केलं. "कुणाल खेमू तुला बाईक्स आवडतात, आम्हाला आमच्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षा. हळहळ व्यक्त केल्याने दुर्घटना टळल्या असत्या तर बरं झालं असतं. ह्याची जाणीव पुढच्या वेळी घटना घडून गेल्यावर होणार नाही, अशी आशा. ई-चलान इथून पाठवलं आहे," असं उत्तर पोलिसांनी कुणाल खेमूला दिलं आहे.