मुंबई : 'पाकिजा' सारख्या चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री गीता कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे गीता कपूर गेले काही महिने वृद्धाश्रमात दिवस ढकलत होत्या.


आईच्या मृत्यूच्या 30 तासांनंतर कन्या आराध्या आल्या, तर पुत्र राजा यांचा अद्यापही पत्ता नाही. आपल्या मुलाची भेट घडावी यासाठी गीता कपूरच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याचं नाव घेत होत्या.

गीता कपूर यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्या 67 वर्षांच्या होत्या.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गीता कपूर यांची तब्येत बिघडल्यानंतर राजा कपूर यांनी एका खासगी हॉस्टिलमधून अॅम्ब्युलन्स मागवली आणि आईला रुग्णालयात दाखल केलं, मात्र 21 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ना ते आईला भेटायला आले, ना त्यांनी कोणत्या फोनला उत्तर दिलं. महत्त्वाचं म्हणजे राहतं घरही राजा कपूर सोडून गेले.

'पाकिजा'च्या अभिनेत्रीची करुण कहाणी, हॉस्पिटलमध्ये सोडून मुलाचा पळ

सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित आणि निर्माते रमेश तौरानी यांनी गीता कपूर यांची रुग्णालयाची बिलं चुकती करुन त्यांना वृद्धाश्रमात दाखल केलं होतं.

अंतिम संस्कार करण्यासाठी राजा यांनी यावं, म्हणून अशोक पंडित दोन दिवस थांबले होते. अशोक यांनी ट्विटरवरुन पार्ल्याच्या कूपर रुग्णालयातील व्हिडिओही शेअर केला होता.

अखेर रविवारी रात्री गीता यांच्या कन्या आराध्या यांनी कोणालाही न कळवता आईवर अंत्यसंस्कार 'उरकले'. त्यामुळे अशोक पंडित यांनी खंत व्यक्त केली.

दुसरीकडे, आईच्या दुर्दशेबद्दल आपल्याला सूतराम कल्पना नव्हती, असा दावा आराध्या यांनी केला. मात्र गेल्या वर्षी गीता कपूर यांना सोडून मुलगा पसार झाल्यानंतर प्रसारमाध्यमांचे कॅमेरे तिथे वळले होते. इतकी चर्चा होऊनही लेकीला बातमी न कळणं पटण्यासारखं नाही.

पाकिजा, रजिया सुलताना, प्यार करके देखो यारख्या हिंदी सिनेमांत या अभिनेत्री गीता कपूर यांनी काम केलं आहे. 100 हून अधिक सिनेमांत काम केल्याचं गीता कपूर सांगतात. मुलाने थकवलेल्या हॉस्पिटलच्या बिलामुळे त्या गेल्या वर्षी पुन्हा चर्चेत आल्या होत्या.