मुंबई : 'दशक्रिया' चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना 'ज्युली 2' ची तिकीटं दिल्याचा प्रकार मुंबईतील नेरुळमध्ये उघडकीस आला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या नावे जमा होणारा गल्ला थेट हिंदी चित्रपटांना जातो का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सेल्स टॅक्सचे उपायुक्त दिलीप देशमुख नेरुळच्या मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये 'दशक्रिया' चित्रपट पाहायला गेले असता त्यांना 'ज्युली 2' ची तिकीटं देण्यात आली. रात्री 9 वाजता या सिनेमाचा शो होता. देशमुख चित्रपटाला पोहोचले, त्यांना प्रवेशही मिळाला. पण मध्यांतरात सहज म्हणून तिकीट तपासलं असता आपल्याला 'ज्युली 2' या चित्रपटाचं तिकीट दिल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

खरंतर 'दशक्रिया' चित्रपटासाठीच त्यांनी पैसे मोजले आणि त्यांना तोच चित्रपट पाहायलाही मिळाला. पण गल्ला जमा झाला 'ज्युली 2' या हिंदी चित्रपटाच्या नावावर.

दिलीप देशमुख तिकीट काऊंटरवर विचारणा करण्यासाठी गेले, पण त्यावेळी काऊंटर बंद होतं. मात्र यासारख्या घटना याआधीही घडल्या असतील. त्यामुळे या प्रकारानंतर चित्रपटांच्या नावाने जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या गल्ल्यावर शंका उपस्थित होत आहे.