मुंबई : मुंबईतील 2011 मधील किनन सँटोस आणि रुबेन फर्नांडिस दुहेरी हत्याकांडप्रकरणाचा अखेर न्यायनिवाडा झाला आहे. विशेष न्यायालयाने जितेंद्र राणा, सतीश, सुनील आणि दीपक या चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

 

काय आहे प्रकरण?

अंधेरीतल्या बारबाहेर 20 ऑक्टोबर 2011 रोजी  किनन आणि रुबेनची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीला गेलेल्या किनन आणि रुबेन एका पानाच्या दुकानावर पान खाण्यासाठी थांबले होते. यावेळी दोषी जितेंद्र राणाने दोघांसोबत असलेल्या एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, ज्याला किनन आणि रुबेनने विरोध केला. यानंतर आरोपी आणि दोघांमध्ये झटापटही झाली. याचा राग मनात धरत आरोपीने काही वेळानंतर आपल्या साथीदारांना बोलावून भर रस्त्यात किनन आणि रुबेनची हत्या केली होती.

 

 

जितेंद्र राणा, सतीश, सुनील आणि दीपक यांच्यावर खून, विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावर विशेष न्यायालयात चार वर्ष युक्तीवाद सुरु होता. अखेर पाच वर्षांनी या दुहेरी हत्याकांड प्रकरणी किनन आणि रुबेन यांन न्याय मिळाला आहे.