पुणे : सिनेमात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप करत पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने 'दशक्रिया' सिनेमाला विरोध दर्शवला होता. यासाठी ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील अनेक थिएटर आणि मल्टिप्लेक्सना भेट देऊन सिनेमा दाखवू नये, अशी मागणी केली होती.


त्यानुसार, सुरुवातीला कोथरुडमधील सिटी प्राईड मल्टिप्लेक्सने सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेताल. तसेच बुक माय शो आणि इतर ऑनलाईन बुकिंगही सिटी प्राईड कोथरुडकडून बंद करण्यात आलं.

पण आपल्या निर्णयावरुन यू-टर्न घेऊन सिटी प्राईडसह पुण्यातील अनेक मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये दशक्रिया हा सिनेमा दणक्यात प्रदर्शित करण्यात आला.

विशेष म्हणजे, या सिनेमासाठी प्रेक्षकांनीही कुणाचीही तमा न बाळगता सिनेमाला गर्दी केली. संध्याकाळी आठच्या शोसाठी सिटीप्राईडने ऑनलाईन बुकिंग सुरु केलं असून, त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, ‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन औरंगाबादमध्ये पुरोहित संघटना आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पुरोहितांनी बंद पाडलेल्या ‘दशक्रिया’ सिनेमाच्या शोला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे.

पुरोहितांनी आज सकाळी प्रोझोन मॉलमधील सिनेमागृहात घुसून निदर्शनं केली आणि सिनेमाचा शो बंद पाडला. चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी आरोप करत सिनेमा प्रदर्शित करु नये अशी मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात पुरोहित संघटनांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. पण खंडपीठाने पुरोहित संघटनांची याचिका फेटाळून लावल्याने चित्रपट महाराष्ट्राभर प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

खंडपीठाने हा निर्णय देताना, सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांच्यावरील लघुपटाचा संदर्भ दिला.

संबंधित बातम्या

'दशक्रिया'विरोधातील पुरोहितांची याचिका फेटाळली

‘दशक्रिया’ प्रदर्शित व्हावा, त्यावर चर्चा व्हाव्यात : अविनाश पाटील


‘दशक्रिया’ दाखवणार नाही, पुण्यातील ‘सिटी प्राईड’चा निर्णय


BLOG : दशक्रिया सिनेमाला विरोध का?