Mukta Barve Chaarchoughi Drama : मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा (Mukta Barve) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचं 'चारचौघी' (Chaarchoughi) हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. आता तिने या नाटकातला एक प्रवेश सादर करुन वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांना अनोखी मानवंदना दिली आहे. 


मुक्ताने बर्वेने 'चारचौघी' या नाटकात विद्या ही भूमिका साकारली आहे. याआधी या नाटकात विद्याची भूमिका वंदना गुप्ते साकारत होत्या. आता या नाटकातील व्हायरल व्हिडीओमध्ये मुक्ता बर्वे म्हणतेय,"आम्ही बायका घटस्फोट या प्रकाराची एवढी भीती बाळगतो. तुमच्या त्या तसल्या प्रेमप्रकरणाची एवढी धास्ती घेऊन बसतो की, त्या दडपणाखाली सगळं सत्त्व झिजून जातं रे...आणि आमच्या सारख्या शिकलेल्यांची अवस्था अजूनच वाईट...शिक्षणामुळे आलेला आधुनिक दृष्टीकोण तरी नवऱ्याबद्दलचा हळवेपणा...खरंतर ना आम्ही ठामपणे निर्णय घ्यायला हवेत. हो.. आणि ऐक मी तो निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत मी घटस्फोट घेणार आहे". 


मुक्ता बर्वेने 'चारचौघी' या नाटकातील प्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा दुसऱ्याचं प्रेम मिळवण्यापेक्षा स्वत:चं अस्तित्व टिकवणं जास्त महत्त्वाचं होतं". मुक्ताच्या या व्हिडीओवर अगं तू वेडी आहेस का, किती छान प्रवेश सादर केला आहेस, खूप छान नाटक आहे, काय अभिनय केला आहेस यार, हीच खरी वस्तुस्थिती आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






'झी नाट्यगौरव 2023' नुकताच पार पडला असून यात वंदना गुप्ते यांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी रंगभूमीवरच्या सर्वात तरुण अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. त्यानिमित्ताने मुक्ता बर्वेने 'चारचौघी' या नाटकातला प्रवेश सादर करून वंदना गुप्ते अनोखी मानवंदना दिली आहे.


मुक्ता बर्वेने वंदना गुप्ते यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"डबलसीट मध्ये सासू-सून म्हणुन एकत्र होतो, रूद्रममध्ये आई- मुलगी म्हणून आणि आता 'चारचौघी'मध्ये तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणून. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम...जशी आहेस तशीच मस्त,बिनधास्त,दिलखुलास रहा. तुझ्या एनर्जीने आम्हाला प्रेरणा देत रहा". 


संबंधित बातम्या


Chaarchoughi : पुन्हा नाट्यगृह गजबजलं! 'चारचौघी' नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल्ल