मुंबई: टीम इंडियाचा वनडे कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर तयार करण्यात आलेला बायोपिक 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' याचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला. ते असे कोणते तीन खेळाडू होते ज्यांंना धोनी संघात घेण्यास तयार नव्हता. पण ते तीन खेळाडू कोण हे आता कायमच गुपित राहणार आहे. कारण या सिनेमात त्या तीनही खेळाडूंच्या नावाचा उच्चार करण्यात आलेला नाही.


दिग्दर्शक नीरज पांडेचं म्हणणं आहे की, हा धोनी आणि त्याच्या संघातील खेळाडूंचा प्रश्न होता. जर सिनेमात ही नावं घेतली असती तर बरंच काही बिघडलं असतं.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक सीनमध्ये धोनीची भूमिका साकारणारा सुशांत सिंह राजपूत म्हणतो की, हे तीन खेळाडू एकदिवसीय संघात आता फीट बसत नाही. त्यावेळी निवड समिती सदस्य म्हणतात की, धोनी त्या खेळाडूला बाहेर काढायला बघतोय ज्यांनी त्याला पुढे जाण्यास मदत केली.



यावर सुशांत म्हणतो की, 'आपण सर्व सेवक आहोत आणि राष्ट्रीय कार्य करीत आहोत.' सिनेमातील या सीनबद्दल दिग्दर्शक पांडे यांचं म्हणणं आहे की, त्यामध्ये आपण खेळाडूंचं नाव लपविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिग्दर्शक पांडे म्हणाले की, 'सिनेमातील या सीनमध्ये आम्ही तीन खेळाडूंचं नाव लपविण्याचा निर्णय एका बैठकीदरम्यान घेतला. जर नावं घेतली असती तर यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सिनेमाचं नुकसान होण्याची मोठी शक्यता होती. तसंच ते तीन खेळाडू जे देशासाठी खेळले आहेत. त्याच्याविषयी वेगळं मत तयार होण्याची शक्यता होती. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला.'

दरम्यन, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.