सलमान खानने आपल्या आयुष शर्मासाठी लवयात्री या सिनेमाची निर्मिती केली आहे. ती निर्मिती सलमानची असल्यामुळे या सिनेमाकडे त्याच्या चाहत्यांचं विशेष लक्ष होतं. त्यात नव्याने सिनेसृष्टीत दाखल होणारी वारिना हुसेनची चर्चाही आहेच. कारण सलमानने स्वत: ट्विट करून ही माहीती दिली होती. आता तो सिनेमा रिलीज होतो आहे. पण दुर्दैवाने सिनेमा रिलीज होण्याआधी त्याची जेवढी चर्चा होती तीच एक सकारात्मक म्हणता येईल. कारण हा चित्रपट सर्वच पातळ्यांवर आपली घोर निराशा करतो. अपवाद केवळ आणि केवळ त्यातल्या गाण्यांचा. एेन नवरात्रीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे यातली गाणी दांडियासाठी उपयोगी ठरतील इतकंच काय ते या सिनेमाचं योगदान.

अभिराज मीनावाला या दिग्दर्शकाचा हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे मुळात त्याचं नवखेपण सिनेमाभर लख्ख दिसत राहतं. त्यात आयुष आणि वारिना या दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. संधी मिळणं ही निश्चित चांगलीच बाब आहे. सलमानने आयुषला लाॅंच करण्यासाठी त्याला तयार केलं आहे. म्हणजे, त्यानं आपला लूक चांगला केला आहे. तब्येत केली आहे. तो उत्तम नाचतो. पण या सगळ्यात अभिनय या नावाची बाबही असायला लागते. हे सांगायला सल्लू विसरला की काय असं वाटत राहतं. वारिनाची गतही अशीच. ही मुलगी दिसायला छान आहे. पण आपला चेहरा अजिबात विस्कटू नये याची काळजी तिने घेतली आहे. त्यांच्यासोबत राम कपूर आणि रोहित राॅय या दोघांना जोडून दिलं आहे. त्यांचा अभिनयही कठपुतळ्यांच्या बाहुल्यांसारखा.. म्हणजे जेवढं सांगितलं आहे तेवढंच करण्यावर भर देणारा.

गोष्ट सहज साधी. सुश्रुत हा अभ्यासात ढ. पण त्याला नाचात रस. स्वत:ची गरबा अकादमी उघडायचं त्याचं स्वप्न आहे. त्यामुळे घरात, क्लासमध्ये, काॅलेजमध्ये हा सतत डान्स शिकवत असतो. आता तर नवरात्रीचा सीझन तोंडावर असल्यामुळे गरब्याची तयारी जोरावर असते. इतक्या सगळ्या मुलांना, मुलींना शिकवूनही सुश्रुतला ज्याला प्रेमाने सूसू म्हणतात त्याला एकही मुलगी आवडलेली नाही. पण त्याचा मामा त्याला मार्गदर्शन करतो आणि एेन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्याला एक मुलगी सापडते. तिचं नाव मिशेल. आणि मग या दोघांचा गरबा, दांडिया सुरू होतो. त्याचा मामा अचानक श्रीकृष्णाच्या भूमिकेत जाऊन प्रेमाची गीता सांगू लागतो. त्यानुसार वागताना भांडणं, प्रेम, हे सगळं होतं आणि मग सिनेमा पुढे जातो. अशा सिनेमात पुढं काय होतं ते वेगळं सांगायला नको.

तर अशी ही ढोबळ गोष्ट. कलाकारांच्या उथळ अभिनयामुळे भयंकर अळणी होते आणि आजारी असल्यासारखं तोंड करून आपल्यालाही ती भरून घ्यावी लागते. खरंतर सलमान खानने स्वत: लाॅंच होताना ही गोष्ट निवडली असती का असा प्रश्न मनात सतत येत राहतो. आयुष शर्माला इंडस्ट्रीत यायचं आहे हे खरं आहे. पण त्यासाठी त्याला भयंकर कष्ट घ्यावे लागणार आहेत. वारिना तर दे मार सिनेमांमध्ये चालून जाईल, कारण अशा सिनेमांमध्ये नायिकेची गरज केवळ दिसण्यासाठी आणि नाचण्यासाठी असते.

म्हणूनच हा सिनेमा तुमचं रंजन करत नाही तर एका पाॅइंटनंतर त्याचं इरिटेशन येऊ लागतं. म्हणूनच या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळताहेत केवळ दीड स्टार. वरचा अर्धा स्टार आहे तो यातल्या गाण्यांना. यंदाच्या नवरात्रीत ही गाणी त्यातल्या त्यात वाजतील अशी अपेक्षा आहे. असो.