बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2018 03:25 PM (IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला. शिवसैनिकांसह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटामध्ये बाळासाहेबांची हुबेहुब भूमिका साकारली असल्याचे ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. या ट्रेलरने बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच चित्रपटाची पटकथा लिहिली असून अभिजित पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी या चित्रपटाचा सिक्वलदेखील बनवला जाणार असल्याचे सांगितले आहे. चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात ठाकरे सिनेमातील तीन दृश्य आणि काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही आज चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि शिवसेना समोरासमोर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.