मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि नवोदित अभिनेत्री पूजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'मोहंजोदारो' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
आकाशादित्य लामा नावाच्या व्यक्तीने 'मोहंजोदारो' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सिनेमाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांविरोधात कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही याचिका दाखल
करण्यात आली होती.
गोवारीकरांसोबत 'लगान', 'स्वदेस' सारख्या चित्रपटांसाठी काम केलेले संकलक जसविंदर सलुजा यांना 2001 मध्ये ही कथा आपण सांगितल्याचा आरोप लामा यांनी केला होता. यासंबंधात गोवारीकरांना जाब विचारणारे ईमेलही आपण पाठवल्याचं लामांनी म्हटलं आहे. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
मुंबई हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ही याचिका फेटाळली होती. मात्र लामा यांनी कोर्टाच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका डबल बेंचकडे दाखल केली. त्यानंतर ही याचिकाही फेटाळण्यात आली. मोहंजोदारो हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.