कोलकाता : हुल्लडबाज तरुणांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप माजी मिस इंडिया युनिवर्स आणि मॉडेल-अभिनेत्री उशोशी सेनगुप्ताने केला आहे. उशोशीने फेसबुकवरुन आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची वाच्यता केली होती. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. उशोशी सेनगुप्ताने 2010 साली मिस इंडिया युनिवर्सचा किताब पटकावला होता.


उशोशी आपलं काम आटोपून कोलकात्यातील एका हॉटेलमधून घरी येण्यासाठी निघाली होती. सोमवारी रात्री 11.40 वाजता ती एका सहकाऱ्यासोबत निघाली. दोघांनी उबर बूक केली होती. अर्ध्या रस्त्यात काही तरुणांचं टोळकं आलं आणि त्यांनी उशोशीच्या कॅबला बाईकने टक्कर दिली. इतक्यावर न थांबता त्यांनी कॅब चालकाला बाहेर काढून मारहाण करायला सुरुवात केली.

'घटनास्थळी एक पोलिस अधिकारी होता. मी त्यांना तरुणांना थांबवण्यास सांगितलं. मात्र हे भवानीपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याचं सांगून त्यांनी मला टोलवलं. वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी काही जणांना अटक केली, मात्र त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करुन पळ काढला. तेव्हा कुठे भवानीपूर पोलिसातून दोघं पोलिस आले' असं पुढे उशोशीने फेसबुकवर लिहिलं आहे.


उशोशी आणि तिच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरुन निघण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही काही जण पाठलाग करत होते. 'तीन बाईक्सवर आलेल्या सहा जणांनी आम्हाला मारहाण केली. मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे त्यांनी मला बाहेर खेचलं आणि व्हिडिओ डिलीट करुन फोन तोडण्याचा प्रयत्न केला. मी आरडाओरडा केल्यावर काही जण जमा झाले.' असा दावा उशोशीने केला आहे.

कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल न केल्यामुळे कोलकाता पोलिस आयुक्तांनी तपासाचे आदेश दिले आहेत.