मुंबई : यशराज फिल्म्सच्या सिनेमांची शूटिंग महाराष्ट्रातही होते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मुजोरी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. ‘टायगर जिंदा है’ सिनेमामुळे ‘देवा’ सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नसल्याने मनसे आता आक्रमक झाली आहे.

यशराज फिल्म्सची दादागिरी चालू देणार नाही. मुजोरीला उत्तर देणार. चर्चेतून प्रश्न सुटला तर ठीक, नाहीतर महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.

मराठी चित्रपटांना आपल्याच राज्यात स्क्रीनिंगसाठी भीक मागावी लागते, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, असे सांगताना खोपकर पुढे म्हणाले, “आमचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमाला विरोध नाही, यशराजच्या दादागिरीला विरोध आहे.”

महाराष्ट्रात मराठी सिनेमालाच प्राधान्य मिळायला हवं. मराठी सिनेमांना स्क्रीन न देणाऱ्या मल्टिप्लेक्सचे लायसन्स रद्द करावेत, अशी मागणी खोपकरांनी केली. शिवाय, यासंदर्भात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी अमेय खोपकर यांच्यासोबत ‘देवा’ सिनेमातील अभिनेता अंकुश चौधरीही उपस्थित होता.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ आणि मराठीतील ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे 'टायगर जिंदा है'चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे. यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे.

'देवा'च्या टीमला ही गोष्ट कळल्यावर त्यांनी थेट मनसेचा रस्ता धरला.

नेमका काय आहे वाद?

येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'. बऱ्याच दिवसांनी हिंदीत बिग बजेट सिनेमा येत असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही कंबर कसली आहे.

मात्र सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे.

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर 5 खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केला आहे. त्यामुळे  देवा आणि गच्ची सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवाची मनसेकडे धाव

या प्रकारामुळे ‘देवा’च्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतल्यानंतर मनसेने देवाला जागा देण्यास थिएटर मालकांना बजावलं आहे. ‘देवा’च्या टीमने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली.

यानंतर देवा या मराठी चित्रपटाला थिएटर न मिळाल्यास मनसे स्टाईनने आंदोलनाचा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

नितेश राणेंचा इशारा

दरम्यान, या वादात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली.

महाराष्ट्रात ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल, तर ते थिएटरर्स ना कुठलाच टायगर वाचू शकणार नाही!!  असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिला आहे.

महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असंही त्यांनी निक्षून सांगितलंय.

संजय राऊत

"देवा"चं काय. प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे. मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे., असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा: संजय निरुपम

'टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात