नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी-अभिनेत्री योगिता बाली आणि मुलगा-अभिनेता महाअक्षय चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायलेकाविरोधात बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्याची सक्ती केल्याचा आरोप आहे.

योगिता आणि महाअक्षयविरोधात हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्रीने तक्रार केल्याची माहिती आहे. लग्नाच्या आमिषाने महाअक्षयने शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा तिने केला आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याचं 'एएनआय' वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शीला शर्मा आणि दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची कन्या मदालसा शर्मासोबत महाअक्षय रिलेशनशीपमध्ये होते. 7 जुलै रोजी दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती होती.

महाअक्षय उर्फ मिमोहने 2008 साली 'जिमी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर हाँटेड, लूट यासारख्या काही चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

मदालसा शर्माने मॉडेलिंगसोबतच अभिनयही केला आहे. 2009 मध्ये प्रदर्शित 'फिटिंग' या तेलुगू चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं.