Mithun Chakraborty Health Updates : बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना ब्रेनस्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिथुन यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे चाहते चिंतेत होते. आता रुग्णालयातून त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्व आवश्यक चाचण्या आणि रेडिओलॉजी तपासणी करण्यात आल्या. वैद्यकीय चाचणीत मिथुन चक्रवर्ती यांना Ischemic Cerebrovascular Accident (Stroke) झाला असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू होते.
मिथुन यांचा रुग्णालयातील व्हिडीओ समोर...
'एएनआय'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 73 वर्षीय मिथुन चक्रवर्ती डॉक्टरांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी मिथुन चक्रवर्ती आपल्या प्रकृतीबाबत माहिती घेत असल्याचे दिसत आहे. डॉक्टरही मिथुन यांना प्रकृती आता चांगली असल्याचे सांगत आहेत.
डॉक्टरांची टीम मिथुन यांच्यावर लक्ष ठेवून...
मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेवून आहे. मिथुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णालयाने स्टेटमेंट जारी केले. मिथुन यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले. मिथुन यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कार्डियोलॉजिस्टशिवाय एक न्यूरो फिजीशियन आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टसह डॉक्टरांची एक टीम कार्यरत आहे.