मुंबई : दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला आहे. संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत, मीना मंगेशकर खडीकर यांना यंदाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या वर्षी, संगीत आणि कलेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना देण्यात आला. भारतीय संगीत आणि सिने उद्योगातील समर्पित सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कार तर दीनानाध विशेष पुरस्कार ज्येष्ठ गायिका संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना देण्यात आला आहे. प्रख्यात अभिनेते प्रेम चोप्रा यानाही चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनाही रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आयुष्यभराच्या सेवेबद्दल मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल माला सिन्हा यांनाही विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा वागविलासिनी पुरस्कार संतोष आनंद यांना जाहीर करण्यात आला आहे. कवयित्री नीरजा यांना कविता आणि साहित्यातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. याशिवाय डॉ. प्रतीत समदानी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निबोळकर, डॉ. अश्विन मेहता, डॉ. निशित शहा आणि डॉ समीर जोग यांना औषध आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर म्हणाले, गायक, संगीतकार आणि नाट्य अभिनेते म्हणून मास्टर दीनानाथजी यांचे महाराष्ट्र आणि देशभरातील कलाप्रेमींसाठी अतुलनीय आणि प्रेरणादायी योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ, मंगेशकर कुटुंब दिग्गजांना सन्मानित करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार घोषित केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे".