Raundal: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' चित्रपटात मुख्य भूमिका साकारून नावारूपाला आल्यानंतर 'बबन' चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेला भाऊसाहेब शिंदे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या महत्त्वपूर्ण आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे. 'रौंदळ' (Raundal) असं महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडं शीर्षक असणारा हा चित्रपट पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. यातील भाऊसाहेबचा रांगडा लुक रसिकांपासून चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांच्याच मनात कुतूहल जागवणारा ठरला आहे. त्या मागोमाग आलेल्या टिझरनं 'रौंदळ'बाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज होणाऱ्या या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे.
भूमिका फिल्म्स अॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थे अंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी 'रौंदळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजानन नाना पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'रौंदळ' या चित्रपटातील 'मन बहरलं...' हे लक्ष वेधून घेणारं नवं कोरं गाणं नुकतंच सोशल मीडियाद्वारे रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे मुख्य भूमिकेत अ
सल्याचं टिझरमध्येच समजलं होतं, पण त्याच्या जोडीला कोणती अभिनेत्री झळकणार हे रहस्य गुलदस्त्यातच होतं. 'मन बहरलं...' या गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्रीचं रहस्यही उलगडण्यात आलं आहे. या चित्रपटात भाऊसाहेबची जोडी नेहा सोनावणे या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. 'रौंदळ'मधील 'मन बहरलं...' या गाण्याद्वारे नेहाची रुपेरी पडद्यावर एन्ट्री झाली आहे. भाऊसाहेब आणि नेहा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे रोमँटिक साँग गीतकार डॅा. विनायक पवार यांनी लिहिलं आहे. गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. पहिल्या वहिल्या प्रेमातील अबोल भावना या गाण्यात नेहानं सुरेखरीत्या सादर केल्या आहेत. सुरेल वाद्यांचा अचूक मेळ साधणारं संगीत आणि त्या जोडीला अनोख्या शैलीत हाताळलेला कॅमेरा हे 'मन बहरलं...' या गाण्याचं सौंदर्य वाढवणारं ठरणार आहे. गावातील वास्तवदर्शी लोकेशन्स आणि कथानकातील प्रसंगांना साजेशी अर्थपूर्ण शब्दरचना हे या गाण्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरनं या चित्रपटाचं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे. डिओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, फैझल महाडीक यांनी एडिटींग केलं आहे. पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचं असून, कोरिओग्राफी नेहा मिरजकर यांची आहे. मंगेश भिमराज जोंधळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली असून 2023 मध्ये रौंदळ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: