Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर मधमाशांचा हल्ला (Honeybee Attack) झाला आहे. सयाजी शिंदे यांनी पुणे बंगळुरु (Pune-Bangalore Highway) महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला.


पुणे बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तेथील झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं. सयाजी शिंदे यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, ते सुखरुप आहेत. या घटनेत सयाजी शिंदे यांना दुखापत झालेली नाही. 



सह्याद्री देवराई संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड


अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी काही वर्षांपूर्वी एका उपक्रमाची घोषणा केली होती. राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत, त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईकडून दोन मोबाईल नंबर देण्यात आले.  त्या नंबरवर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जुनं आहे, ते कुठे आहे, ही माहिती लिहून व्हॉट्सॲप करायची होती. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 


बुलढाण्यात लग्न वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला


तर काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील दुसरबिड इथे लग्न वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केला होता. 1 मार्च रोजी सायंकाळी लग्न समारंभाच्या वेळी नवरदेव घोड्यावरुन लग्नस्थळी जात असताना डीजेच्या आवाजामुळे झाडावरील मधमाशांनी या लग्नातील वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला केला. यानंतर घोड्यासह नवरदेव धावत सुटला तर वऱ्हाड मंडळी, बँडवाले, लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग करणारा फोटोग्राफरसह सर्वच जण आपला जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत सुटले. यावेळी जवळपास 250 वऱ्हाड्यांना मधमाशांनी चावा घेतला तर नवरदेवाला तात्काळ जवळच्या एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सर्व वऱ्हाडी मंडळींवर उपचार करण्यात आले.


सयाजी शिंदे यांचे आगामी चित्रपट


सयाजी शिंदे हे 'घर, बंदूक, बिरयानी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.  सयाजी शिंदे यांच्यासोबतच नागराज मंजुळे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. सयाजी शिंदे यांच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' लावाच, पण प्रत्येक गावात 75 झाडं लावा; सयाजी शिंदे आणि भालचंद्र नेमाडे यांचे आवाहन