Pinjara Marathi Film: मराठी चित्रपट महाराष्ट्रातील संस्कृती, इतिहास आणि परंपरा लोकांसमोर मांडतात. सध्या मराठी चित्रपट हे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत. पण काही काळ आधी मराठी चित्रपट चालत नाहीत, असं अनेकांचे मत होते. मराठी चित्रपटांना शो कमी मिळतात, त्यामुळे हे चित्रपट चालत नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. पण ज्या काळात लोक दुष्काळाचा सामना करत होते, त्याच काळात रिलीज झालेल्या एका मराठी चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस दाखवून इतिहास घडवला. मराठी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पिंजरा'  या चित्रपटाला रिलीज होऊन आज 51 वर्ष झाली आहेत. 31 मार्च 1972 रोजी  पिंजरा हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटातील संगीत, कालाकांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं बघतात. 


लावण्यवती आणि गुरुजींची गोष्ट


पिंजरा या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व्ही शांताराम हे आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला यशस्वी रंगीत सिनेमा, असंही पिंजारा या चित्रपटाला म्हटलं जातं. तमाशातील एक नर्तकी आणि  आपल्या तत्त्वावर श्रद्धा असलेला एक शिक्षक या दोघांची कथा पिंजरा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. पिंजरा या चित्रपटात अभिनेत्री संध्या यांनी चंद्रकला ही भूमिका साकारली. तर अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी गुरुजी ही भूमिका साकारली. पिंजरा चित्रपटातील संध्या यांची नृत्यशैली आजही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. 


"पिंजरा"  या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, अभिनेत्री संध्या यांच्यासोबत निळू फुले, वत्सला देशमुख यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या. या कलाकारांसोबतच या चित्रपटात माणिकराज, गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, सरला येवलेकर, आबू, भालचंद्र कुलकर्णी, इत्यादींच्याही भूमिका आहेत.  या चित्रपटाची कथा आणि पटकथा अनंत माने यांनी लिहिली आहे. तर संवाद शंकर पाटील यांचे आहेत. या चित्रपटातील गीते जगदीश खेबूडकर यांची आहेत तर संगीत राम कदम यांचे आहे. 


चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती 


आली ठुमकत नार’,‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’, 'दिसला ग बाई दिसला ', 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली ', लागली कुणाची उचकी  ही पिंजरा चित्रपटातील गाणी लोकप्रिय ठरली. आजही या सर्वच गाण्यांची लोकप्रियता कायम आहे. या चित्रपटाचे सगळे शूटिंग कोल्हापूरच्या शांतकिरण स्टुडिओत झाले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


BLOG : 'पिंजरा'तील 'लागली कुणाची उचकी' गाताना कस लागला - उषा मंगेशकर