Neha Pendse : मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांत काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहीत नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.
'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये नेहाने सहा गोंडस मुलांची आई असल्याचं कबुल केलं आहे. नेहाने सहा कुत्र्याची पिल्लं दत्तक घेतली आहेत. आपल्या मुलांप्रमाणे नेहा त्या कुत्र्याच्या पिल्लांची काळजी घेते. पिल्लांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सहा मुलांमुळे मी बॉडीगार्डशिवाय राहू शकते, असं नेहा म्हणाली.
नरिमन पॉईंट ते नायगाव हेलिकॉप्टरने प्रवास करणारी नेहा पेंडसे
नेहा गेल्या काही वर्षांपूर्वी शार्दुल बायससोबत लग्नबंधनात अडकली आहे. शार्दुल हा मोठा उद्योगपती आहे. हल्ली मुंबईतल्या मुंबईत गाडीने जातानाही लोकांना विचार करावा लागतो पण नेहाने मात्र पती शार्दूलसोबत नरिमन पॉईंट ते नायगाव चक्क हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. नेहा राहायला नरिमन पॉईंटला असल्याने आणि शूटिंग नायगावला असल्याने प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी नेहाने हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.
टॉकशोमध्ये नेहासोबत सिद्धार्थ मेनननेदेखील हजेरी लावली आहे. यावेळी त्यानेही त्याच्या आयुष्यातील एक गुपित उघड केले. 'गल्ली बॉय' सिनेमातील सिद्धांत चतुर्वेदीने साकारलेल्या एमसी शेर या भूमिकेसाठी सिद्धार्थला विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यानेदेखील या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण अखेर ती भूमिका सिद्धांतला मिळाली.
नेहा पेंडसेबद्दल जाणून घ्या...
'बिग बॉस 12'ची (Bigg Boss) स्पर्धक असलेल्या नेहानं वयाच्या दहाव्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. पहिल्या कामाचं तिला 500 रुपये मानधन मिळालं होतं. नेहाने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. नेहाच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या