Riteish Deshmukh: मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. तसेच अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर मराठा आरक्षणासंदर्भात पोस्ट शेअर करत आहेत. नुकतेच अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
रितेश देशमुखचे ट्वीट
रितेश देशमुखनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो." अनेकांनी रितेशचे हे ट्वीट रिट्वीट देखील केले आहे.
रितेश देशमुखसोबतच अभिनेते किरण माने तसेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने मनोज जरांगेंची पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"एक मराठा लाख मराठा...आणि पाटील साहेबांना काही झाले तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा मग. आता आमच्यावर नुसते लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही" तर किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं. कारण व्सवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणाऱ्या व्यवस्थेला तो धाक दाखवण्याचं महान कार्य तुम्ही करत आहात. तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे".
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सहावा दिवस असल्याने प्रकृती खालावली आहे. त्यांच्या शरीरात अशक्तपणा प्रचंड दिसून येत असल्याने उपस्थित असलेल्या शेकडो मराठा बांधवांनी त्यांना किमान पाणी घेण्याची विनंती केली.
इतर महत्वाच्या बातम्या: