Manoj Bajpayee :  विविध धाटणीच्या भूमिका अतिशय ताकदीने साकारणारा अभिनेता अशी मनोज वाजपेयीची (Manoj Bajpayee) ओळख आहे. रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्याने ओटीटीवरही धमाल केली आहे. 'द फॅमिली मॅन' या स्पाय थ्रिलर वेब सीरिजमधील त्याचे काम कमालीचे लोकप्रिय झाले. याच मनोज वाजपेयीला मराठी दिग्दर्शकासोबत काम करायचे आहे. यासाठी त्याने अंधेरी ते अगदी न्यूयॉर्कपर्यंत आपली इच्छा या दिग्दर्शकाला बोलून दाखवली.


अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने मंगळवारी एकाच वेळी 70 वेब सीरिज, चित्रपटांची घोषणा केली. त्यावेळी 'पाताल लोक' (Pataal Lok)  या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली. या वेब सीरिजची घोषणा होत असताना मनोज वाजपेयी हे सूत्रसंचालक होते. तर, स्टेजवर 'पाताल लोक-2' ची (Pataal Lok 2) टीम उपस्थित होती. यावेळी मनोज वाजपेयी याने 'पाताल लोक'च्या टीमचे कौतुक केले. 


मनोज वाजपेयीने मागितले काम


यावेळी मनोज वाजपेयीने 'पाताल लोक'चा दिग्दर्शक अविनाश अरुण याच्याकडे काम  मागितले. मनोज वाजपेयीने म्हटले की, मी या दिग्दर्शकाचा मोठा चाहता आहे. मी अनेक वर्षांपासून स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल हा माझ्या डीएनएमध्ये आहे. मी स्ट्रगल करतो आणि जे हवे ते मिळवतो. मात्र, ज्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे, त्यांच्याकडे मी काम मागत असतो. आम्ही पृथ्वी थिएटरमध्ये भेटलो तेव्हा मी त्याच्याकडे काम मागितले. त्यानंतर आम्ही अंधेरीत एखाद्या भागात भेटलो तेव्हाही त्यांच्याकडे काम मागितले. मी अगदी न्यूयॉर्कमधील फूटपाथावर, भररस्त्यातही त्याच्याकडे काम मागितले आहे. त्यावर दरवेळेस अविनाशकडून पाहतो सर, आपण बोलूयात,  अशी उत्तरे मिळाली. आता तरी दिग्दर्शकाने मला कामाबाबत कन्फर्म सांगावे असे मनोज वाजपेयींने म्हटले. 


अविनाश अरुण हे सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. 'किल्ला' आणि 'थ्री ऑफ अस' या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी 'मसान', 'दृश्यम', 'मदारी' आणि 'हिचकी' या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे


श्रीकांत तिवारी आणि हाथीराम चौधरी एकत्र झळकणार?






'द फॅमिली मॅन'चा श्रीकांत तिवारी आणि 'पाताल लोक'चा हाथीराम चौधरी हे एकत्र दिसण्याची शक्यता आहे. वेब सीरिजच्या घोषणेच्या वेळी तसे संकेत देण्यात आले. मात्र, ठोसपणे काही सांगण्यात आले नाही. मनोज वाजपेयीने हाथीराम आणि श्रीकांत एकत्र दिसू शकतात का, असा प्रश्न केला. त्यावर अभिनेता जयदीप अहलावतने देखील सहमती दर्शवली. प्राईम व्हिडीओच्या हेड अपर्णा पुरोहित यांना विचारले असता त्यांनी माझ्याकडून कोणतंही गुपित उलगडण सोपं नसल्याचे सांगितले. 


 इतर संबंधित बातम्या :