Sara Ali Khan :  अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या चर्चेत आहे. सलग दोन आठवड्यात तिचे दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असते. या माध्यामातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. तर, दुसरीकडे तिला काहीजण ट्रोलही करतात. सारा अली खानला तिच्या आडनावावरून आणि धर्मावरून अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. यावर भाष्य न करणाऱ्या सारा अली खानने आता ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी कधीही माफी मागणार नसल्याचे सारा अली खानने सांगितले. 


सारा अली खानची आई अमृता सिंह हिंदू आहे, तर वडील सैफ अली खान मुस्लिम आहेत. त्यामुळे साराला आडनाव आणि धर्मावरून ट्रोलर्सच्या टोमण्यांना, ट्रोलिंगला सामारे जावे लागते. सारा अली खानने Galatta India ला मुलाखत दिली होती.  यावेळी तिने आडनावावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 


साराने ट्रोलर्सला दिले जोरदार प्रत्युत्तर


सारा अली खानने आपल्या मुलाखतीत म्हटले की,  माझा जन्म एका धर्मनिरपेक्ष कुटु्ंबात झाला. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याविरोधात उभं राहण्याचे संस्कार आहे आणि म्हणूनच फक्त माझ्याविरोधातच नाही तर आजूबाजूलादेखील कोणासोबत चुकीच्या गोष्टी होताना दिसत असेल तर मी त्यांच्यासाठी उभी राहिल. सारा अली खानने म्हटले की, माझी धार्मिक आस्था, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, मी एअरपोर्टवर कशी जाते, हे सगळे निर्णय माझे आहेत. याबाबत कोणीही ढवळाढवळ करू नये आणि कोणाचीही यासाठी माफी मागणार नसल्याचे तिने म्हटले. मंदिर असो की मशीद, तिची प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा आहे, असे आपल्या धर्मावर प्रश्न करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिले आहे. मी कुठे जायचे आणि जायचे नाही हे ठरवण्याचा अधिकार माझा असल्याचे तिने म्हटले. 






दोन आठवड्यात दोन ओटीटीवर चित्रपट


सारा अली खानचे बॅक टू बॅक दोन चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. साराचा 'मर्डर मुबारक' 15 मार्चला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत करिश्मा कपूर, विजय वर्मा, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.  'ए वतन मेरे वतन' हा चित्रपट आज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सारा अली खआनने उषा मेहता या स्वातंत्र्यसेनानींची भूमिका साकारली आहे. उषा मेहता यांनी 'चले जाव' आंदोलनाच्यावेळी एक भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केले होते.