मुंबई : बिग बॉस फेम इराणी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करिमीने पतीविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. पती गौरव गुप्ताविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची केस तिने अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली आहे.


बिग बॉसच्या नवव्या पर्वात झळकलेच्या मंदनाचा चेहरा घराघरात पोहचला होता. मुंबईतील बिझनेसमन गौरव गुप्ताशी जानेवारी महिन्यात तिने लगीनगाठ बांधली होती. मात्र सात आठवड्यांपूर्वी सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढल्याचा आरोप मंदनाने केला आहे. पती गौरवनेही आपल्याशी संपर्क तोडल्याचा दावा तिने केल्याचं 'मिड-डे'ने म्हटलं आहे.

आपल्याला दरमहा दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी मंदनाने याचिकेत केली आहे. त्याशिवाय या कालावधीत करिअरचं झालं नुकसान आणि मानसिक त्रासासाठी दोन कोटी रुपये देण्यासही तिने सांगितलं आहे.

मंदनाने क्या कूल है हम 3, मै और चार्ल्स यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 'चित्रपट व्यवसाय हा आपल्याला कौटुंबिक प्रतिष्ठेला साजेसा नसल्याचं सांगत लग्नानंतर नवऱ्याने चित्रपटात काम करण्यास मनाई केली. त्यामुळे करिअरचं नुकसान झाल्याचा उल्लेखही तिने याचिकेत केला आहे.

लग्नानंतर गौरवच्या कुटुंबीयांनी आपल्याला धर्म बदलण्यास भाग पाडलं, असंही मंदनाने तक्रारीत म्हटलं आहे. सात आठवड्यांपूर्वी सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढलं, मी त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी मला थारा दिला नाही, असा दावा मंदनाने केला आहे.

जवळपास दोन वर्षांच्या डेटिंगनंतर मंदना करिमीने 26 जानेवारी 2017 रोजी मुंबईतील बिजनेसमन गौरव गुप्ताशी कोर्टात विवाह केला. 5 मार्च रोजी ते हिंदू पद्धतीने लग्नबद्ध झाले.