Manava Naik : अभिनेत्री मनवा नाईकला (Manava Naik) उबेरने प्रवास करताना एका धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला. यासंदर्भात भाष्य करणारी एक फेसबुक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली. मनवाची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून तिच्या तक्रारीवरून आता उबर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच पुढील कारवाईला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात मनवाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.


धक्कादायक प्रसंगावर एबीपी माझाशी बातचीत करताना मनवा म्हणाली,"मुंबई पोलीस खूप सक्रिय आहेत. तसेच हे शहरदेखील खूप सुरक्षित आहे. माझ्यासोबत काल घडलेली घटना फार क्वचित घडते. पण अशी घटना घडायला नको. त्यामुळे नागरिक म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे". 


मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मनवाच्या पोस्टवर कमेंट केली आहे,""मनवा जी... आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन 8 यावर काम करत आहे. तसेच चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल". यावर भाष्य करत मनवा म्हणाली,"विश्वास नांगरे पाटील नेहमीच माझ्या मदतीला धावून आले आहेत. मी काल ट्वीट केल्यानंतर लगेचच मला मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यांनी माझी चौकशी केली. लगेचच उबर चालकावर कारवाईदेखील झाली. आयुष्यात अशी एखादी घटना घडते. अशावेळी त्या गोष्टीचा सामना करणं गरजेचं आहे". 



मनवा पुढे म्हणाली,"मुंबई शहारात रात्री-बेरात्री मुलींना-स्त्रियांना घराबाहेर पडावं लागतं. त्यामुळे मुलींनी सतर्क राहणं गरजेचं आहे. ओला-उबरसारख्या अॅपने नोकरीसाठी निवड करताना चालकांचा पाठपुरावा करायला हवा. त्यांची वैयक्तिक माहिती तपासून घ्यावी. तसेच नागरिक म्हणून आपण जबाबदारीने वागलं पाहिजे. उदा. उबेर बुक करताना जो चालक आहे. तो आपल्या अॅपवरचा चेहरा आहे का हे बघायला हवं. प्रवासादरम्यान लाईव्ह लोकेशन कुटुंबियांसोबत शेअर करावं". 


संबंधित बातम्या :


Manava Naik : "रुक तेरेको देखता हूँ..."; मनवा नाईकने शेअर केला उबरमधील धक्कादायक प्रसंग