Baiju Paravoor Death: मल्याळम दिग्दर्शक आणि प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह बैजू परावूर (Baiju Paravoor) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 42 वर्षी अखेरचा श्वास घेतला. बैजूच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे . बैजू परावूर यांचे निधन अन्नातून विषबाधा झाल्यामुळे झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. बैजू यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी शोक व्यक्त केला आहे.
बैजू हे एका चित्रपटावर चर्चा करण्यासाठी कोझिकोडमध्ये गेले होते. शनिवारी कारने घरी परतत असताना त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे बैजू यांनी कुन्नमकुलम येथे त्यांच्या पत्नीच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. सासरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथेही त्यांचा त्रास कमी झाला नाही. त्यानंतर रविवारी बैजू हे त्यांच्या घरी परतले.
बैजू यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर कुझुपिल्ली येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने कोची येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रा आणि त्यांची मुले आराध्या आणि आरव असं कुटुंब आहे. सोमवारी (26 जून) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढील महिन्यात रिलीज होणार होता चित्रपट
दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या बैजू (Baiju Paravoor) यांनी प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केले. त्यांनी धनियम आणि कथोलचथन यासह 45 चित्रपटांसाठी प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून काम केले. बैजू परावूर यांनी स्वत: लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला सिक्रेट हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार होता. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. पण सिक्रेट हा चित्रपट रिलीज होण्याआधीच बैजू यांनी जगाचा निरोप घेतला. छप्पू, दक्ष, सालेश या कलाकारांनी सिक्रेट या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :