मुंबई : इतर देश खेळात पुढे आहेत ते ठिक आहे, पण आम्हीही पुढे जाऊ. भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप कष्ट घेत आहेत. लेखिका शोभा डे यांनी खेळाडूंविषयी केलेलं ट्विट किंवा त्यांच्या मताशी मी सहमत नाही, असं बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान म्हणाला.

 

आमीर खान आणि सत्यजीत भटकळ यांनी पाणी फौंडेशनच्या कार्याची माहिती 'माझा कट्टा'वरुन दिली.

 

यावेळी आमीरला ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं. तसंच लेखिका शोभा डे यांनी केलेल्या ट्विटबाबतही प्रतिक्रिया विचारण्यात आली.

 

शोभा डेंबाबत मी काय बोलू

आमीर म्हणाला, "सोशल मीडियावर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मात्र भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप कष्ट घेत आहेत. अनेक वर्षांची मेहनत त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवते. ऑलिम्पिकसाठी पात्र होणं हेच आमच्यासाठी मोठं आहे. हार-जीत तर होत राहते. त्यामुळे शोभा डे यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार".

 

शोभा डेंचं ट्विट

शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली होती. ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला होता. भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट शोभा डे यांनी केलं होतं. त्यावरुन शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.



 

साक्षी मलिकची मॅच रात्री जागून पाहिली

पैलवान साक्षी मलिकने कालच रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. त्याबाबत बोलताना आमीर म्हणाला, "साक्षी उत्तम खेळली. साक्षीची संपूर्ण मॅच मी रात्री जागून पाहिली. साक्षी पिछाडीवर पडल्याने धाकधूक होत होती. पण तीने शेवटच्या क्षणी मुसंडी मारुन जबरदस्त कामगिरी केली आणि भारताला पदक मिळवून दिलं. साक्षीची कामगिरी खूपच उत्तम होती".

 

विनेश फोगटची दुखापत दुर्दैवी

यावेळी आमीरने काल ऑलिम्पिकमध्ये पैलवान विनेश फोगटला झालेली दुखापत दुर्दैवी असल्याचं नमूद केलं. विनेशने आपल्याला सुवर्णपदक मिळवून दिलंच असतं, असा विश्वास आमीरने व्यक्त केला.

 

विनेश फोगट या भारतीय महिला पैलवानाला कालच्या कुस्तीदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे ती ऑलिम्पिकबाहेर पडली आहे.

 

बबिता कुमारीकडून आशा

दरम्यान आज विनेश फोगटची चुलत बहिण पैलवान बबिता कुमारी ही आज कुस्तीच्या मैदानात उतरणार आहे. आमीरने बबिता कुमारही पदक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तर गीताच्या कामगिरीकडेही लक्ष असल्याचं आमीर म्हणाला.

 

आमीरचा आगामी दंगल सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात आमीर खानने पैलवान महावीर फोगट यांची भूमिका साकराली आहे. बबिता आणि गीता या महावीर फोगट यांच्या मुली आहेत. तर काल पदक जिंकलेली विनेश ही महावीर यांची पुतणी आहे.

संबंधित बातमी


शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा