Maharashtra Shahir Teaser: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाचा टीझर हा रिलीज झाला आहे. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. यावेळी राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 


काय म्हणाले राज ठाकरे?


महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या टीझर लाँच सोहळ्यामध्ये राज ठाकरे यांनी शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला, "बाळासाहेबांना 'बाळ' अशी हाक मारणाऱ्या लोकांपैकी एक शाहीर होते. शाहीरांचा प्रवास हा स्वातंत्र चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत असा आहे. जेव्हा मला केदारनं चित्रपटाबद्दल सांगितलं तेव्हा मला धाकधूक होती. मी त्याला प्रश्न विचारला की, शाहीरांचे काम कोण करणार? तर त्याने अंकुश चौधरी उत्तर दिलं.  तो शाहीरांसारखा दिसेल का? असा प्रश्न मी त्याला विचारला. तर त्याने मला सांगितलं, तो त्यांच्या भूमिकेत शिरेल. मी आज चित्रपटाचा टीझर पाहिला. मला दिसलं की, अंकुश हा खरंच भूमिकेत शिरला आहेस." 


महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या टीझरमध्ये अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसत आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांची भूमिका साकारलेले कलाकार देखील दिसत आहेत. टीझरमधील अंकुशच्या विविध लुक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. हा टीझर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


पाहा टीझर



महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Shahir Movie: 'फडकेल नव्याने भगवा, महाराष्ट्र पुन्हा गर्जेल...'; केदार शिंदेंनी शेअर केला 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाचा खास व्हिडीओ