Baharla Ha Madhumas: ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज (27 फेब्रुवारी) ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेक वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट रिलीज आधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले 'बहरला हा मधुमास...’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे.
एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर झालेले हे गीत म्हणजे 1942 सालच्या रंगात रंगलेले आणि 2023 सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे.
गुरु ठाकूर यांनी लिहिलेले हे गाणं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिले आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत.
पाहा गाणं:
“हे एक प्रेमगीत असून शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या प्रेमाची कथा त्यातून अलगद उलगडत जाते. शाहीर म्हणजे माझे आजोबा हा अस्सल सातारी रांगडा गडी तर माझी आजी ही शहरी पार्श्वभूमी असलेली एक सुविध्य तरुणी. कलेच्या एका धाग्याने दोघेही एकत्र आलेले आणि जणू एकमेकांसाठीच जन्मलेले. 'बहरला हा मधुमास...’मधून त्यांच्या प्रेमकथेचा जणू एक आगळा आविष्कारच समोर येतो. गीतकार आणि संगीतकारांनी या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे,” असे उद्गार चित्रपटाचा दिग्दर्शक केदार शिंदे याने काढले. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या: