पुणे : ज्यांनी मराठी संगीतसृष्टीला भावगीतांनी समृद्ध केलं, त्याच अरुण दातेंचा मुलगा कफल्लक अवस्थेत आहे. ज्याचं नाव संगीत, ज्याचं घराणं सुरांनी श्रीमंत, तोच आज भिकाऱ्याचं जीणं जगत आहे.

 

 

व्यवसायाच्या निमित्ताने सुमारे 8 दिवसांपूर्वी संगीत दाते हे पुण्यात आले. त्यांच्या दाव्याप्रमाणे एका गाडीनं त्यांना धडक दिली. त्या अपघातात, त्यांचं सर्व साहित्य अज्ञातांनी लुटलं. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण तिथून त्यांना बाहेर काढण्यात आलं. बेघर आणि विमनस्क झालेल्या संगीत दातेंनी अखेर फ्लायओव्हरखाली आसरा घेतला.

 
गेल्या 6 दिवसांपासून पोलिस त्यांना ओळख विचारत होते, पण ते काही ताकास तूर लागू देईना. माहिती काढल्यानंतर त्यांना आता उपचारांसाठी पाठवत आहेत.

 
संगीत यांची ही अवस्था होण्यासाठी फक्त अपघातच नाही, तर कुटुंबकलहही कारणीभूत असल्याचा दावा ते करतात. माझ्या सख्खा भावाने माझा आणि वडिलांचा संपर्क तोडून टाकला. माझे नंबर डिलीट केले. पैसा, दुसरं काही नाही, असं संगीत म्हणतात.

 
पण संगीत यांचे हे सारे आरोप बंधू अतुल दाते यांनी फेटाळले आहेत. संगीत दाते हे व्यसनी आहेत. ते दारु पिऊन सर्वांना त्रास द्यायचे. पत्नीलाही मारहाण करायचे. त्यामुळे 4 वर्षांपूर्वी कायदेशीर नोटीस देऊन त्यांना बेदखल करण्यात आलं. बाबांनी त्यांना वांद्र्यात घरही दिलं होतं, तेही त्यांनी विकलं. पण त्यातून आलेल्या पैशाचं त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही, असं ते म्हणतात.

 
अरुण दातेंनी आपल्या मुलाचं नाव संगीत ठेवलं होतं. त्यामागे त्यांची इच्छा काय असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणात दोष कुणाचा हे माहित नाही, पण आयुष्य कधी, कुठे आणि कसं वळण घेईल हे सांगता येत नाही.