Malayalam Actor Innocent Death: मल्याळम (Malayalam) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार इनोसंट (Innocent) यांचे कोची येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांना 3 मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी (26 मार्च) रात्री 10.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली.
कलाकारांनी व्यक्त केला शोक
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता इंद्रजीत सुकुमारन, अभिनेते आणि निर्माते टोविनो थॉमस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. पृथ्वीराज सुकुमारननं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'सिनेमाच्या इतिहासातील एका आयकॉनिक अध्यायाचा शेवट! रेस्ट इन पीस लीजेंड!'
अभिनेत्री पियरले मॅनीनं देखील इनोसंट यांना श्रद्धांजली वाहिली. तिनं सोशल मीडियावर इनोसंट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'इनोसंट सर, तुमची कायम आठवण येईल. तुमच्याबद्दल मनात कायम आदर राहील.'
कॅन्सरवर केली मात
अभिनेते इनोसंट यांनी कॅन्सरवर मात केली. 2012 मध्ये त्यांना कॅन्सरचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये कॅन्सरवर मात केली होती. इनोसंट यांनी पृथ्वीराज सुकुमारनसोबत 2022 मध्ये रिलीज झालेल्या कडुवा चित्रपटात काम केलं. त्यांनी 700 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते मिमिक्री आर्टिस्ट देखील होते. ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन होते. इनोसंट हे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत होते.
महत्वाच्या इतर बातम्या: