'पाकिझा'तील गाण्याचं आतिफकडून रिमिक्स, लतादीदी चिडल्या
एबीपी माझा वेब टीम | 03 Sep 2018 11:43 PM (IST)
आतिफ अस्लमने चलते चलते यूही कोई मिल गया था गाण्याचं रिमिक्स केल्यामुळे गानकोकिळा लता मंगेशकर चिडल्या आहेत
मुंबई : 'चलते चलते यूही कोई मिल गया था...' या 'पाकिझा' गाजलेल्या मुजऱ्याचं रिमिक्स केल्यामुळे मूळ गायिका अर्थात गानकोकिळा लता मंगेशकर वैतागल्या आहेत. 'कोणाच्या परवानगीने हे रिमिक्स केलं' असा जाब लतादीदींनी विचारला आहे. साक्षात लता मंगेशकर यांचा आवाज, गुलाम मोहम्मद यांचं संगीत आणि पडद्यावर मीना कुमारी... 'चलते चलते यूही कोई मिल गया था...' या 'पाकिझा' चित्रपटातील मुजऱ्यात हा त्रिवेणी संगम जुळून आला होता. पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमने 'मित्रों' या चित्रपटात या गाण्याचं नवीन वर्जन गायलं आहे. तनिष्क बागची यांनी म्युझिक अरेंजमेंट केलेलं हे गाणं ऐकण्याआधीच लता मंगेशकर भडकल्या. 'मला ते गाणं ऐकायचंही नाही. जुन्या गाण्यांचं रिमिक्स करण्याचा ट्रेण्ड मला अजिबात आवडलेला नाही. लोकांना आवडणारी क्लासिक्स उचलायची आणि त्यातले नोट्स इथे-तिथे करायचे, यात कसली आली क्रिएटिव्हिटी? रिमिक्समध्ये काही वेळा शब्दही बदलले जातात. कोणाच्या परवानगीने करतात हे?' असा सवाल लता मंगेशकर यांनी विचारला.