Kushal Badrike On Raavrambha Movie : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल बद्रिके (Kushal Badrike) घराघरांत पोहोचला आहे. सध्या तो 'रावरंभा' या सिनेमात झळकत आहे. या सिनेमात त्याने कुरबतखानाची भूमिका साकारली आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना कुशलने लहान मुलं आणि पालकांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे.
कुशलने लिहिलं आहे,"मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा तानाजी मालुसरे आधी कळायला हवा. मुलांना स्पार्टन-300 ची गोष्ट कळायला हवी, पण पावनखिंडीवर बाजीप्रभू देशपांडेंसह प्राणांची आहुती देणारे 300 मावळे आधी कळायला हवेत. लढाई जिंकून देणारा महाबली हल्क मुलांना माहित हवा, पण शौर्य आणि इमान यांच दुसरं नाव असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते आधी काळायला हवेत".
कुशलने पुढे लिहिलं आहे,"आयर्न मॅनची गोष्ट मुलांना आपण सांगायलाच हवी, पण लोखंडाच्या सळ्यांनी डोळ्यांच्या खाचा झाल्या तरीही एकही हुंदका न देणारे आपले छत्रपती संभाजी राजे आधी कळायला हवेत. कॅप्टन अमेरिकेच्या नेतृत्वाला लाजवील असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर रक्तात भिनायला हवं. आपले सुपरहिरोज मुलांना आधी कळायला हवेत. यावेळी आम्ही घेऊन आलोय आपल्या अशाच '7सुपरहिरो'ची कहाणी. वेडात दौडलेल्या त्या 'सात वीरांची' गोष्ट. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सोबतीच्या सहा मावळ्यांची गोष्ट. मुलांना ही गोष्ट बघायला नक्की घेऊन या".
कुशल बद्रिकेच्या 'रावरंभा' सिनेमासंदर्भातली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट लहान मुलांना आणि पालकांना उद्देशून आहे. आजची पिढी सुपरहिरोंमध्ये रस असलेली आहे. दरम्यान खरे सुपरहिरो कोण आहेत याची जाणीव करुन देणारी पोस्ट कुशलने 'रावरंभा'च्या निमित्ताने केली आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल घराघरांत पोहोचला. कुशलचा 'पांडू' (Pandu) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता कुशलच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या