KRK - Manoj Bajpayee : केआरके (KRK) उर्फ कमाल आर खान नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ट्वीट करत तो बॉलिवूडच्या कलाकारांवर निशाणा साधत असतो. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर टीका होते. 30 ऑगस्ट 2022 रोजी पोलिसांनी वादग्रस्त ट्वीटमुळे केआरकेला ताब्यात घेतलं होतं. आता पुन्हा एकदा मनोज वाजपेयीसोबत (Manoj Bajpayee) घेतलाला पंगा केआरकेला महागात पडला आहे. मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात आता केआरके (KRK) विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
लोकप्रिय अभिनेता मनोज वाजपेयीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर, इंदौरच्या जिल्हा न्यायालयाने केआरके विरोधात अटक वॉरंट काढलं आहे. मनोजचे वकील परेश जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. केआरकेने ट्वीट करत मनोज वाजपेयीला 'चरसी' आणि 'गंजेडी' म्हटलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
केआरकेने 26 जुलै 2021 रोजी मनोज वाजपेयीविरोधात एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्याने मनोजला 'चरसी' आणि 'गंजेडी' असं म्हटलं होतं. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी केआरकेने ट्वीट केल्याचा आरोप मनोजने केला होता. 'फॅमिली मॅन 2' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर केआरकेनने ट्वीट केलं होतं, "मी फालतू नसून वेबसीरिज पाहात नाही. तुम्हाला चरसी आणि गंजेडी मनोज का आवडतो?".
मनोज वाजपेयीचे वकील परेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी केआरकेविरोधात 16 मार्च रोजी अटक वॉरंट जारी केलं आहे. तसेच 10 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मनोज वाजपेयी प्रकरणी स्पष्टीकरण देत केआरके म्हणाला, "सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या प्रकरणी जिल्हा न्यायालयात माझ्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती जेएमएफसीला करण्यात आली आहे. जेएमएफसीला केआरकेनेही कॅन्सरने पीडित असल्याची माहिती दिली होती.
केआरके उच्च न्यायालयात आपला बचाव करत म्हणाला की, वाजपेयी किंवा भारतीय सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही कलाकाराचा अपमान करण्याच्या हेतूने कधीही कोणतंही भाष्य केलं नाही".
संबंधित बातम्या