Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. किरण माने हे विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
किरण माने यांनी आजीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले, "किरन, त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं..लै बेकार हाय त्यो...तस्ली संगत लै वंगाळ." ...सातार्यातल्या माझ्या घरी निळू फुले येऊन गेले हे कळाल्यावर आजी घाबरून म्हणायची. तिला वाटलं आपला नातू बिघडला ! तिला सिनेमातलं सगळं खरं वाटायचं. कितीही समजाऊन सांगीतलं तरी पटायचं नाही तिला... आजीला आम्ही 'काकी' म्हणायचो. आईची आई. लै लै लै माया केली तिनं माझ्यावर. सगळ्याच नातवंडांवर तिचा जीव होता. '
किरण माने यांनी या पोस्टच्या माध्यामातून आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'बालपण आणि तरुणपण लै लै लै कष्टात आणि हलाखीत गेलं पण त्याची जराही खंत तिने कधी बोलून दाखवली नाही. बख्खळ आयुष्य लाभलं तिला. नातवंडांची मुलंबी तिच्या मांडीवर खेळली !जवळजवळ नऊ वर्ष झाली. मी मुंबईत होतो. नाटकाचे सलग प्रयोग लागले होते. प्रयोगाला जातानाच फोन आला 'काकी गेल्या'... मेंदू बधिर झाला. अस्वस्थ झालो. काकींचं अंत्यदर्शनही घेता येणार नाही या जाणीवेनं ढसाढसा रडलो. एकटाच. त्यानंतर साताठ दिवसांनी गेलो.सतत उत्साहानं सळसळणारं माझं आजोळ पहिल्यांदा एवढं उदास आणि भकास पाहिलं मी. सगळं होतं पण माझी काकी नव्हती ! खरंतर माणूस गेल्यावर महिनाभर तरी घरात गोडधोड करत नाहीत पण मामींनी माझ्यासाठी शिरा केला.म्हणाल्या "लाडका नातू आलाय. 'गरा' केला.'
बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमुळे किरण माने यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. विविध मालिकांमध्ये देखील किरण माने यांनी काम केलं आहे.
संबंधित बातम्या