Kiran Mane : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि लोकप्रिय अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनयासह सामाजिक, राजकीय मुद्द्यावर ते भाष्य करत असतात. आता शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 


किरण मानेंची पोस्ट काय? (Kiran Mane Post)


किरण माने यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा केला पण तो शत्रूविरुद्ध केला. त्यावेळचा समाज अज्ञानी, अशिक्षित असूनही शिवरायांनी त्यांचा गैरफायदा घेतला नाही. हल्ली आपल्याच माणसांच्या विरोधात गनिमी कावा करणाऱ्यांची सद्दी आहे. विशेष म्हणजे शिकले-सवरलेले लोक अशा भामट्यांची 'अंधभक्ती' करतात". 


किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव



किरण माने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शत्रूसोबत करताना तो गनिमीकावा, आपलेच जेव्हा आपल्याच माणसांसोबत विश्वासघात करतात तेव्हा ती गद्दारी होते, अगदी खरं, नक्कीच शिवरायांनी गनिमीकावा स्वराज्याच्या शत्रूविरुद्ध केला स्वत:च्या लोकांविरुद्ध नव्हे, सैन्यात जातीवाद होऊ नये म्हणून एकत्र जेवण असायच..पहील शिळं पाकं खाऊनही इमान कायम होतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


किरण माने यांनी याआधी मराठा आरक्षणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. यात लिहिलं होतं,"मराठा बांधवांनो, तहात हारू नका."...सदर अध्यादेश 16 फेब्रूवारी 2024 पासून किंवा त्यानंतर लागू होईल." आणि "...यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील." हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे. निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा. एक मराठा लाख मराठा".


किरण मानेंना भोवलेली राजकीय पोस्ट


किरण माने 'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारत होते. अभिनयासह ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे भाष्य करत असतात. 'मुलगी झाली हो' दरम्यान त्यांनी केलेली राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी राजकीय दबावातून वाहिनीनं मालिकेतून काढलं, या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आलं त्यानंतरच मालिकेतून काढलं असल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. 


किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय भूमिका मांडत असतात. त्यांच्या या वादग्रस्त पोस्टमुळे अनेकदा ते ट्रोल होतात. 'सातारचा बच्चन' अशी किरण माने यांची ओळख आहे. सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारे किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माई' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत किरण माने यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती.