Kedar Shinde On Baipan Bhaari Deva : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पाच कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने रिलीजच्या दहा दिवसांत 26.19 कोटींची कमाई केली आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाबद्दल बोलताना एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले,"मी हा सिनेमा पुरुषांसाठी बनवला आहे. या सिनेमाला मिळत असलेलं यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. हा सिनेमा आता आमचा नसून मायबाप प्रेक्षकांचा झाला आहे. ". 


'बाईपण भारी देवा' हा सिनेमा  केदार शिंदेंनी का केला? 


'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. पण हा सिनेमा करावासा का वाटला याबद्दल बोलताना ते म्हणाले,"बाईपण भारी देवा' या सिनेमाची गोष्ट ऐकल्यानंतर मला या सिनेमाचं तिकीट काढावसं वाटलं. फायदा तोटा यापेक्षा काम करण्याकडे मी जास्त लक्ष दिलं. चांगले सिनेमे असतील तर ते पाहायला प्रेक्षक नक्कीच येतात, असं मलाही जाणवलं आहे. लोकांना काय पाहायचं आहे, त्यांची काय मानसिकता आहे, याचा विचार करुन कलाकृती बनवण्याचा विचार करतोय". 


'बाईपण भारी देवा'मुळे प्रेक्षकांचा मराठी सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बददला आहे का? 


केदार शिंदे म्हणाले,"बाईपण भारी देवा' या सिनेमातला जो संदेश आहे,'थोडा श्वास घ्या आणि स्वत: साठी जगा' हा महिलांना भावला आहे. हा संदेश महिलांपर्यंत योग्यपद्धतीने पोहोचला आहे. खरंतर 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा मी पुरुषांसाठी बनवला आहे. जोपर्यंत पुरुष स्त्रियांचं मन ओळखू शकत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील पुरुषांना सिनेमा दाखवणं जास्त गरजेचं आहे. 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा पाहताना महिला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. पण आता या महिलांनी त्यांच्या घरातील पुरुषांना सिनेमा दाखवण्याची त्यांना जबाबदारी आहे. 


प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला 'बाईपण भारी देवा'


'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने 13.50 कोटींची कमाई केली होती. तर रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने 26.19 कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या 11 व्या दिवशी या सिनेमाने तीन कोटींचा गल्ला जमवला आहे. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर महिलाराज! 'बाईपण भारी देवा'ने आतापर्यंत केली 29.05 कोटींची कमाई