Kedar Shinde : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. केदार शिंदे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक असून त्यांनी अनेक मराठी सिनेमे, मालिका आणि नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. 


केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना कलेची गोडी निर्माण केली. शाहीर साबळेंच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून केदार शिंदे यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पुढे कॉलेजला गेल्यावर त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. कॉलेजमध्ये असताना केदार शिंदे यांनी भरत जाधव आणि अंकुश चौधरीसोबत काम केलं आहे. 


केदार शिंदेंची लोकप्रिय नाटकं...


'बॉम्ब-ए-मेरी-जान' या व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून केदार शिंदे यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांचं हे पहिलच नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं. पण तरीदेखील त्यांनी काम सुरू ठेवलं. पुढे त्यांची सर्वच नाटकं यशस्वी ठरली. 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', 'श्रीमंत दामोदरपंत','तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' अशा अनेक नाटकांमध्ये केदार शिंदे यांनी काम केलं आहे. केदार शिंदे यांनी प्रामुख्याने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी विनोदी नाटके केली आहेत. 


नाट्यसुष्टीत यश मिळू लागल्यानंतर केदार शिंदेंनी मालिकाविश्वात काम करायला सुरुवात केली. हाऊसफुल्ला, हसा चटकफु, श्रीयुत गंगाधर टिपरे, जगावेगळी, साहेब, बिवी आणि मी, घडलंय बिघडलंय, अशा अनेक मालिकांच्या माध्यमातून केदार शिंदे यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.


केदार शिंदेंचा सिनेप्रवास... 


केदार शिंदे यांनी 'अगं बाई... अरेच्चा' (Aga Bai Arrecha) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यांचा हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले. या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. केदार शिंदे यांनी 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. केदार शिंदे यांनी 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'तो बात पक्की' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. तब्बू आणि शर्मन जोशी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. सध्या केदार शिंदेंचा 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे.