मुंबई : ब्रिटीश वंशाची अभिनेत्री कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. कतरिना पाठोपाठ तिची धाकटी बहीणही आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. कतरिनाच्या होम प्रॉडक्शनमधूनच तिची बहीण इसाबेल पदार्पण करण्याची शक्यता आहे.
कॅनडियन रोमँटिक कॉमेडी असलेल्या 'डॉ. कॅबी' या चित्रपटातून इसाबेलने चित्रपटात प्रवेश केला. बहिणीचा अभिमान वाटून कतरिनाने 'इसाबेलला बॉलिवूडमध्ये यायचं असेल, तर मी तिची मदत करेन' असं म्हटलं होतं. त्यामुळे बहिणीला दिलेला शब्द कतरिना आता प्रत्यक्षात उतरवणार आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान इसाबेलला लाँच करणार असल्याच्या चर्चा होत्या. इसाबेल कतरिनापेक्षा टॅलेंटेड असल्याचंही त्याने म्हटलं होतं. इसाबेलच्या डेब्यू फिल्मचा सलमान सहनिर्माता असण्याची शक्यता होती. मात्र आता कतरिना तिचीच निर्मिती असलेल्या चित्रपटातून इसाबेलला बॉलिवूडमध्ये आणणार आहे.
कतरिनाने मात्र याविषयी मौन बाळगलं आहे. आपल्याला चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरायचं आहे. एक ना एक दिवस आपण चित्रपट काढणार आहोत, मात्र कधी, कोणासोबत हे अद्याप निश्चित नसल्याचं ती सांगते. कतरिनाला तीन मोठ्या बहिणी, तीन धाकट्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. आठ भावंडांच्या गोतावळ्यापैकी इसाबेल आता चित्रपटात झळकणार आहे.
आतापर्यंत मोठ्या बहिणीचं बोट धरुन शमिता शेट्टी (शिल्पा शेट्टी), परिणीती चोप्रा (प्रियंका चोप्रा), तनिषा (काजोल) यासारख्या अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यापाठोपाठ कतरिनाची धाकटी बहीणही बॉलिवूडमध्ये नशिब आजमावणार आहे.