मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'धडक'चं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. धडक हा नागराज मंजुळेच्या गाजलेल्या 'सैराट' या मराठी सिनेमाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. करणने ट्विटरवरुन पोस्टर शेअर करताना नवीन रीलीजिंग डेटही जाहीर केली आहे. धडक चित्रपट 20 जुलै 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. यापूर्वी 6 जुलै 2018 ही 'धडक'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली होती.
हा चित्रपट 18 वर्षांच्या जान्हवीचा डेब्यू आहे. 22 वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स'मध्ये झळकला होता. तर उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका साकारली होती.
खैतान यांच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' दोन चित्रपटातून 'स्टोरी टेलिंग'चा छान अनुभव प्रेक्षकांना मिळाला होता. त्यामुळे 'धडक'कडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.
एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. तर अनेक पुरस्कारही खिशात घातले.