कपिल शर्माने ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे. “मागील पाच वर्षांपासून 15 कोटींचा आयकर भरत आहे. तरीही कार्यालय बनवण्यासाठी माझ्याकडून मुंबई महापालिकेने 5 लाखांची लाच मागितली,” असा संताप कपिलने व्यक्त केला.
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये ‘हेच अच्छे दिन आहेत का?’, असा सवाल करत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
'लाचखोर अधिकाऱ्याचं नाव उघड करा'
दरम्यान लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलं आहे. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कपिल शर्माला लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात, "कपिल भाई कृपया नाव जाहीर करा. दोषीवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात सोडणार नाही", असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
किरीट सोमय्यांचं ट्विट
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कपिल शर्माकडून लाच मागितल्याचं ऐकून दु:ख झालं. आपल्याला मुंबई महापालिका भ्रष्टाचाऱ्यांच्या हातातून मुक्त करायची आहे, असं ट्विट सोमय्यांनी केलं.