मुंबई: ऑफिसच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेत 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप करून, ट्विटरवर बॉम्ब टाकलेल्या कॉमेडियन कपिल शर्मावरच हे प्रकरण उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली, ते वर्सोव्यातील ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे.
वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे.
आज सकाळी कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्विट करून महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरासाठी 5 लाख मागितल्याचा आरोप केला. इतकंच नाही, तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवण करून दिली. शिवाय हेच का अच्छे दिन असा सवालही विचारला.
पण ट्विटला 6 तास उलटण्याच्या आधीच कपिलचं हे ट्विटरअस्त्र त्याच्यावर उलटण्याची शक्यता आहे.
दरम्यान कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनंही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे.
संबंधित बातम्या
कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री
कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्मा