Kapil Sharma New Show On Netflix : छोट्या पडद्यावर कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) आपल्या शोने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले. आता कपिल शर्माचा कॉमेडी शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या शोद्वारे सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) मोठ्या कालावधीनंतर एकत्र काम करणार आहेत. या शोचा प्रोमो देखील लाँच करण्यात आला. हा शो 30 मार्च पासून स्ट्रीम होणार आहे. कॉमेडियन सुनील पालने (Sunil Pal) मात्र, या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रोमो अतिशय वाईट असून कपिल शर्माने कॉमेडीला वाचवावं असं सुनील पालने म्हटले. 


सुनील पालने काय म्हटले?


सुनील पालने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आता कपिल शर्माला कोण वाचवणार असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये सुनीलने कपिल शर्मावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या व्हिडीओत सुनीलने म्हटले की, 'कपिल शर्माने शेअर केलेले नेटफ्लिक्स शोचे प्रोमोज पाहून मी खूप निराश झालो आहे. कपिल शर्मा हा आमचा कॉमेडी सुपरस्टार आहे. कॉमेडीचा बादशाह आहे. प्रत्येक घराघरात कौटुंबिक मनोरंजनाच्या नावाखाली लोकांना आवडते. पण आता त्याचा नवा शो ओटीटीवर येत आहे. प्रोमोज गलिच्छ आहे. वाईट, गलिच्छ शब्दांचा वापर होत आहे.






सुनील पालने पुढे म्हटले की, मला वाटतं इथे कॉमेडीचा बादशाह पराभूत होईल आणि मी माझा बादशाह पराभूत होताना पाहू शकत नाही. मी तुझा खूप मोठा चाहता आहे. जे सुरू आहे ते तुम्हाला थांबवावे लागेल, तुम्ही खरे कॉमेडियन आहात. तुमच्या नवीन शोचा प्रोमो अतिशय घाणेरड्या पद्धतीने सुरू झाला आहे. मी हात जोडून विनंती करतो, असे करू नका. तुमचे चाहते कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यासाठी चांगली कॉमेडी करा. तुम्ही या  सगळ्यांपासून दूर राहा असे सुनील पालने हताशपणे म्हटले. 
 


'नेटफ्लिक्स'वर कपिल शर्माचा नवीन शो


नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' 30 मार्चपासून प्रसारीत होणार आहे. दर शनिवारी रात्री 8 वाजता हो शो प्रसारीत होणार आहे. या शोमध्ये कपिलसोबत सुनील ग्रोव्हर, अर्चना पुरण सिंह, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, राजीव ठाकूर आदी कलाकार दिसणार आहे.