Chetan Kumar Arrested : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) अडचणीत वाढ झाली आहे. हिंदू धर्माबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचं ट्वीट चेतन कुमारने केलं होतं.
चेतन कुमारने 20 मार्चला हिंदू धर्मावर भाष्य करणारं एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं होतं,"हिंदू धर्म खोटेपणावर आधारित आहे. रावणाचा पराभव केल्यानंतर राम अयोध्येत परतला आणि तेव्हा भारतीय राष्ट्राची सुरुवात झाली हे खोटं आहे, 1992 : बाबरी मशीद ही रामाची जन्मभूमी आहे हे खोटं आहे, उरीगौडा-नांजेगौडा हे टिपूचे मारेकरी - खोटं, हिंदुत्वाचा सत्याने पराभव केला जाऊ शकतो, सत्य सर्वांसाठी समान आहे". असे, त्याने ट्वीटमध्ये म्हटले.
चेतुन कुमार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला
चेतन कुमारचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटने एकच गोंधळ उडाला आहे. चेतन कुमारचं नाव याआधीदेखील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याला हिजाब रो संदर्भातही अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांविरुद्धच आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आयपीसी कलम 502(2) आणि 504 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सिनेमागृहात धुमाकूळ घालणाऱ्या 'कांतारा' या सिनेमातील एका सीनबद्दल वक्तव्य केल्यानंतर चेतन कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रारदेखील नोंदवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीटमुळे त्याला बेंगळुरूमधील पोलिसांनी अटक केली आहे. बजरंग दलाचे शिवकुमार यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही करवाई करण्यात आली आहे.
चेतन कुमारबद्दल जाणून घ्या... (Who IS Chetan Kumar)
चेतन कुमार हा कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टिव्ह असतो. समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर तो त्याचं मत मांडत असतो. पण धर्म आणि समानता या मुद्द्यांवरील ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकतो. चेतनने 2007 साली 'आ दिनगाल' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमातील भूमिकेसाठी त्याचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यानंतर 2013 साली 'हिट मैना' या सिनेमातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
संबंधित बातम्या