मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी 'सिमरन' या सिनेमाचं ट्रेलर नुकतच लाँच झालं. यावेळी एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. ती गोष्ट सर्वांत लहान असली, तरी त्यासाठी संघर्ष करावाच लागतो.'


काही दिवसांपूर्वी 'सिमरन'चे लेखक अपूर्व इसरनी यांनी कंगनावर लेखनाचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत तिला प्रश्न विचारला असता तिने याबाबतचा खुलासा केला.

तसेच ती पुढे म्हणाली की, ''तुमच्यातले अनेकजण मला भांडखोर, बंडखोर म्हणतील. पण मला यातून काही फरक पडत नाही. मी माझे हक्क मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. त्यासाठी मला संघर्ष करावा लागला, तरी मी मागे हाटणार नाही.''

आपल्यावरील आरोपांबाबत अधिक खुलासा करना कंगना म्हणाली की, ''याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. वास्तविक, अपूर्वनेच अतिरिक्त संवाद लेखनाचं श्रेय मला घेण्यास सांगितलं होतं. याबाबतची सर्व कागदपत्र आणि करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.''

ती पुढे म्हणाली की, ''यानंतर आम्ही एकत्रितपणे एक शेड्यूल बनवून, एकत्रित काम केलं आहे. पण काही काळानंतर अपूर्वने माझ्याविरोधात अनेक प्रकारचं लेखन करण्यास सुरुवात केली. ते पण अशावेळी, जेव्हा 'रंगून' सिनेमा फ्लॉप झाला होता. अपूर्वशिवाय आणखी दोन ते तीनजणांनीही माझ्यावर टीका केली होती. त्यावेळी मला असं वाटत होतं की, माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे.''

न्यूयॉर्कमधील 'आयफा' सोहळ्यात सैफ अली खान, वरुण धवन आणि करण जौहरकडून 'नेपोटिज्म' वादावरुन कंगनाची खिल्ली उडवण्यात आली. याबाबत तिला प्रश्न विचारला असता, त्याला बगल देत, यावर आपण अधिक काही बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, कंगनाच्या 'सिमरन' या सिनेमाबद्दल बोलताना सिनेदिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले की, ''कंगनासोबत काम करताना चांगला अनुभव होता. तिच्यासोबत यापुढेही काम करण्याची इच्छा आहे,'' असंही ती यावेळी म्हणाले.

'सिमरन' या सिनेमात कंगना प्रफुल्ल पटेल नावाच्या एका गुजराती, जुगारी आणि चोर तरुणीची भूमिका साकारत आहे. तिचा हा सिनेमा 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहा