Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला जवानाला पाठिंबा देणाऱ्यांवर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आपला संताप व्यक्त केला आहे. कंगनाने या घटनेची तुलना ही थेट बलात्कार, हत्येच्या गुन्ह्याशी केली. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या टीकाकारांना आणि त्या महिला जवानाचे कौतुक करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी या घटनेनंतर लगेच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने कंगनाने संताप व्यक्त केला होता.
कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये कंगनाने म्हटले की, प्रत्येक बलात्कारी, खूनी किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमी भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अशी अनेक कारणं असतात. कधीही कोणताही अपराध हा कारणाशिवाय होत नाही. तरीही त्यांना दोषी ठरवले जाते आणि शिक्षा सुनावली जाते असे कंगनाने म्हटले. तिने म्हटले की, पण लक्षात ठेवा की कोणाच्याही खासगी आयुष्यात येणे, परवानगीशिवाय हात लावणे किंवा हल्ला करणे जर योग्य असेल तर बलात्कार व हत्या यामध्येही काही गैर नसावे असे तिने म्हटले.
कंगनाने पुढे म्हटले की, तुमची मनोवृत्तीदेखील अशी असेल तर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य तपासून पाहा. योगा, ध्यान अशा गोष्टींचा अवलंब करावा. अन्यथा तुमचे आयुष्य कठीण होईल असेही कंगनाने म्हटले. एखाद्याबद्दल इतकी घृणा आणि ईर्ष्या मनात ठेवू नका असा सल्लाही कंगनाने दिला.
कानशिलात लगावणाऱ्या जवान महिलेविरोधात एफआयआर
चंदिगड विमानतळावर कंगना रणौतच्या कानशिलात लगावणारी महिला जवान कुलविंदर कौरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, तिच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली नाही.
कंगना रणौतचे प्रकरण काय आहे?
दिल्लीला जाण्यासाठी 6 जून रोजी कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचली होती. सुरक्षा तपासणीदरम्यान कंगना रणौतला सीआयएसएफची जवान कुलविंदर कौरने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ कुलविंदरने कंगनाला मारले. कुलविंदरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिची चौकशी होणार आहे.