Kangana Ranaut Emergency Movie : कंगना रणौतच्या 'एमर्जन्सी' या (Kangana Ranaut Emergency Movie) चित्रपटाचे रिलीज अखेर लांबणीवर पडले आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र, वादात अडकल्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा होती. आता, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या सगळ्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


या चित्रपटाबाबत काही दिवसांपासून बरेच वाद निर्माण झाले आहेत. काही शीख संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय, सेन्सॉर बोर्डाने देखील दिलेले प्रमाणपत्र रद्द केले आहे. 


आता कंगनाने शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर बोलताना आपली निराशा व्यक्त केली आहे. तिने सांगितले की,  'माझ्या चित्रपटावरच आणीबाणी लादण्यात आली आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. मी माझ्या देशाबद्दल खूप निराश आहे आणि परिस्थिती काहीही असो, अशा शब्दात कंगनाने खंत व्यक्त केली. 


सेन्सॉर बोर्डाने रद्द केले प्रमाणपत्र


कंगनाने सांगितले की,  तिच्या चित्रपटात दाखवलेल्या घटना याआधी मधुर भांडारकरच्या 2017 च्या पॉलिटिकल थ्रिलर 'इंदू सरकार' (1975 ची आणीबाणीची घोषणा) आणि गेल्या वर्षीच्या मेघना गुलजारच्या 'सॅम बहादूर'मध्येही दिसल्या होत्या. (1971 भारत-पाकिस्तान युद्ध). कंगनाने सांगितले की, तिला आधीच सीबीएफसीकडून तिच्या चित्रपटाचे प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र, आता चित्रपटाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्यानंतर सीबीएफसीने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द केले आहे. 


मी कोर्टात लढणार...अनकट व्हर्जन रिलीज करणार


कंगनाने या पॉडकास्टमध्ये म्हटले की, अशा प्रकारचे अडथळे मला मनासारखं चित्रपट तयार करण्यापासून रोखू शकत नाही. आज आपण कोणाला तरी घाबरू, लोक आपल्याला घाबरवत राहतील, आपण खूप सहज घाबरतो. आम्ही किती घाबरणार? मी हा चित्रपट मोठ्या स्वाभिमानाने बनवला आहे. त्यामुळे चित्रपट सेन्सॉर बोर्ड कोणताही वाद निर्माण करू शकत नाही. त्यांनी माझे प्रमाणपत्र रद्द केले आहे, परंतु मी चित्रपट अनकट रिलीज करण्याचा निर्धार केला आहे. इंदिरा गांधी यांचा मृत्यू नैसर्गिकपणे झाला हे मी दाखवू शकत नाही, असेही कंगनाने म्हटले आहे.






वादाच्या भोवऱ्यात अडकलाय 'एमर्जन्सी'


'एमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादात अडकला आहे. शीख संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या चित्रपटात शीख समुदायाबाबत चुकीचे चित्रण असल्याचे आक्षेप घेण्यात आला आहे.