मुंबई : कंगना रनौतसाठी हा लॉकडाऊनचा काळ खूपच महत्वाचा ठरला. इतरांप्रमाणेच तीसुद्धा हिमाचल प्रदेशातल्या आपल्या घरी होती. पण सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला आणि अचानक कंगना रनौत आक्रमकपणे पुढे आले. त्यात तिने कुणालाच सोडलं नाही. बराच गदारोळ माजवल्यानंतर कंगना पुन्हा आपल्या गावी गेली. पण आता लॉकडाऊनचे नियम जसे शिथील होऊ लागले तशी कामं सुरू झाली आहेत. चित्रिकरणही त्याला अपवाद नाही. कंगनाही आता चित्रिकरणासाठी सज्ज झाली आहे.


लॉकडाऊन होण्यापूर्वी कंगना रनौत थलैवी या चित्रपटाच्या चित्रकरणात व्यग्र होती. हा चित्रपट तामीळनाडूच्या माजी मुख्यंमंत्री, अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात कंगना मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेतले तिचे काही फोटोही बाहेर आले आहेत. लॉकडाऊन लागला आणि या चित्रपटाच्या चित्रिकरणाला खो बसला. आता जवळपास सात महिन्यांची विश्रांती घेतल्यानंतर या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनी कंगना आपल्या घरातून चित्रिकरणासाठी म्हणून बाहेर पडली आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण सध्या दक्षिणेत सुरू आहे. कंगनानेच ही माहीती आपल्या सोशल मीडियावरून दिली. ही माहीती देतानाच तिने आशीर्वाद घेतले आणि शुभेच्छा मागितल्या आहेत.


लॉकडाऊन काळात सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना बरीच चर्चेत आली आहे. तिने बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना धडकी भरवली आहे. तर नेपोटिझम आणि आऊटसायडर्सना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दलही तिने वारंवार कंठशोष केला आहे. इतकंच नव्हे, तर सुशांतच्या मृत्यूची तपासाची दिशा योग्य नसल्याचं सांगत तिने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्री, खासदार संजय राऊत यांच्यावरही तोफ डागली. हा प्रकार सुरू असताना मुंबईला तिने अनेक हीन उपमा दिल्या. त्यानंतर तिच्या मुंबईच्या आगमनावेळी मुंबई पालिका आणि तिच्यातही युद्ध पेटलं. तिला वारंवार येणाऱ्या धमक्या पाहता केंद्रानेही तिला वाय प्लस सुरक्षा देऊ केली होती. त्यानंतर कंगना हिमाचलमध्ये परतली. आता मात्र सात महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कंगना चित्रकरण करणार आहे. आपण यासाठी खूप उत्सुक असल्याचं तिनं सांगितलं आहे.


रकुल प्रीतही शूटसाठी रवाना


एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आता चित्रकरणासाठी रवाना झाली आहे. सध्या ती क्रिश या चित्रपटाचं दक्षिणेत चित्रीकरण करणार आहे. रिया चक्रवर्तीला अमली पदार्थाबद्दल अटक झाल्यानंतर जी धरपकड झाली त्या चौकशीत रकुल प्रीतसह इतर अभिनेत्रींची नावंही आली होती. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची नावं होतं. रकुलने सुरुवातीला दिल्ली हाय कोर्टात धाव घेतली. पण त्यानंतर एनसीबीने दम भरल्यावर ती चौकशीला समाोरी गेली. ही बाब ताजी असतानाच आता ती चित्रिकरणासाठी सज्ज झाली आहे. रकुल ही ब्रेव गर्ल आहे. चौकशी करण्यात काहीच गैर नाही. त्यामुळे रीतसर परवानगी घेतल्यानंतर ती चित्रिकरणासाठी येते आहे असं क्रिशचे नर्माते सांगतात.