मुंबई : भोजपुरी सिनेसृष्टीचा तारा आणि लोकसभा खासदार रविकिशन यांना आता वाय प्लस सुरक्षा पुरवली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रविकिशन सतत चर्चेत आहे. बॉलिवुडमधले कलाकार अमली पदार्थ सेवन करत असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी असा आग्रह त्याने धरला आहे. त्याने ही मागणी गेल्यानंतर त्याला बॉलिवूडमधून अनेक धमक्यांचे फोन येऊ लागल्याने त्याला ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


अभिनेत्री कंगना रनौतने सर्वप्रथम जाहीरपणे बॉलिवूडमधले अनेक कलाकार अमली पदार्थ सेवन करत असल्याचा उच्चार केला होता. तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे काही कलाकारांची अप्रत्यक्ष नावंही घेतली होती. त्यानंतर रिया चक्रवर्तीसह अनेकांना अटक केली गेली. सुशांतसिह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला असलेला विळखा कसा घट्ट होतो आहे यावर कंगनाने भाष्य केलं होतं. तिच्या या बोलण्याची दखल संसदेत घेतली गेली. अभिनेता रविकिशनने राज्यसभेत या अमली पदार्थाबद्दल भाष्य केलं होतं.


रविकिशन हा भोजपुरी सिनेमाचा तारा तर आहेच. शिवाय तो हिंदी चित्रपटांमध्येही झळकला आहे. राज्य सभेत त्याने या ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. त्यावर जया बच्चन यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा डाव असून संपूर्ण इंडस्ट्री अशी नसल्याचा उच्चार केला होता. त्यानंतर जया बच्चन यांच्याबद्दल बोलताना आपल्याला पुरेसा आदर असून मुद्दा बॉलिवूडमधली घाण साफ करण्याचा आहे असं रविकिशन म्हणाला होता.


रविकिशनने त्यानंतर अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखतीही दिल्या होत्या. त्यात त्याने आपला मुद्दा स्पष्ट केला होता. पण त्यानंतर मुंबईसह अनेक ठिकाणहून त्याने केलेल्या वक्तव्यांबाबत चीड व्यक्त करण्यात आली. त्याला अनेक फोन आले. त्यात काही धमक्यांचे फोनही होते. त्याच्या फोन्सची दखल घेऊन त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला नेमका कुणी फोन केला. फोन करणाऱ्याने आपलं नाव काय सांगितलं. हे सर्व गुलदस्त्यात असून त्याचा तपास चालू आहे. रविकिशनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे याबद्दल ट्विटरवर आभारही मानले आहेत.