सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांच्यावर नेहमीप्रमाणे कमाल खानने केलेल्या टीकात्मक ट्वीटनंतर भट संतापले. इतर वेळी कलाकार ट्वीटरवरुनच केआरकेला उत्तर देतात आणि गप्प बसतात. मात्र विक्रम भट्ट यांनी थेट कारवाईचा बडगा दाखवत खानला ट्विटरवरुन बाहेर हाकलण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्याच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचीही तयारी त्यांनी केली होती.
मात्र या हालचालींनी घाबरलेल्या कमाल खानने एक पाऊल मागे जाण्याचा पवित्रा घेतला. 'द क्विंट' या वेबसाईटवर विक्रम भटच्या फेसबुक लाईव्ह चॅटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं मतपरिवर्तन झाल्याचा दावा कमाल खानने केला आहे. 'कमालने स्वतःची इमेज एक ट्रोल (टेर खेचणारा) अशी करावी की चित्रपट समीक्षक अशी करुन घ्यावी, हे त्यानं ठरवायला हवं' असं मत भट यांनी व्यक्त केलं होतं.
कमाल खानने आतापर्यंतच्या सर्व टीकात्मक ट्वीट्ससाठी माफीनामा मागितला आहे. कमाल खानच्या या भूमिकेने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केआरके मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहे, की यामागे त्याचा काही डाव आहे, असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे.