मुंबई : म्युझिक रिअॅलिटी शोमधून चित्रपटसृष्टीला मिळालेला एक हिरा म्हणून सुनिधी चौहानचा नावलौकिक आहे. बिडी जलैले, शीला की जवानी सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली पार्श्वगायिका सुनिधी लवकरच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.


 
'प्लेइंग प्रिया' या शॉर्टफिल्ममधून सुनिधी नवी इनिंग सुरु करणार आहे. 'लेकर हम दिवाना दिल' या चित्रपटाचे दिग्दर्शक आरिफ अली यांच्या हाती 'प्लेइंग प्रिया'च्या दिग्दर्शनाची धुरा आहे.

 
लवकरच डिजीटल मीडियावर ही शॉर्टफिल्म चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'प्लेइंग प्रिया' ही शहरात घडणारी फँटसी थ्रिलर आहे. खुद्द सुनिधीने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन याबाबत माहिती दिली आहे.

 
'मला अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची खुमखुमी होतीच. मात्र हा अनुभव इतका आनंददायी असेल, असं वाटलं नव्हतं' असं सुनिधी म्हणते. त्यामुळे सुनिधीच्या श्रोत्यांच्या मनात तिच्या नव्या प्रयोगाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.